Wednesday 31 December 2014

मंचाची रचना व कार्यप्रणाली



लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंच रचना व कार्यप्रणाली

मंचाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे
मजनिप्राद्वारे सुरू केली गेलेली जलदर ठरविण्याची प्रक्रिया सिंचन प्रकल्पांचे खासगीकरण यांच्या संदर्भात एकत्रित विचारविनिमय कृतिकार्यक्रमाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या जलक्षेत्रातील संस्था संघटना २००८ पासून एकत्र येण्यास सुरुवात झाली. पुढे या प्रक्रियेतून समन्यायाच्या तत्त्वावर आधारित पाणी वाटपाच्या प्राधान्यक्रमाचा कायद्यामध्ये आवश्यक बदलांचा मसुदा तयार झाला. त्याबद्दलच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आल्या. असे बदल घडवून आणण्यासाठी ठोस कृतीकार्यक्रमाची जोड आवश्यक आहे या भूमिकेतून सर्वांनी मिळून एक ठोस कृतिकार्यक्रम ठरवून तो दीर्घकालासाठी राबविण्याच्या दृष्टीने लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाची स्थापना २०१० साली करण्यात आली.

स्थापना बैठकीत म्हटल्याप्रमाणे मंच तत्वांबाबत तडजोड न करणारा परंतु सहभागाच्या पातळीवर खुल्या स्वरूपाचा आहे. महाराष्ट्र राज्यातील जलक्षेत्रामधील कायदेशीर धोरणात्मक चौकटीमध्ये व्यापक जनहिताच्या दृष्टीने समन्यायाच्या दिशेने सकारात्मक बदल सुचवून ते घडवून आणण्यासाठी कृतिकार्यक्रम राबविणे हे मंचाचे व्यापक उद्दिष्ट आहे व याच्याशी सुसंगत असे काम मंच हाती घेईल. त्यानुसार कामाच्या व्याप्तीमध्ये, धोरणात्मक व राज्य स्तरावरील प्रश्नांना प्राधान्य राहील. मात्र वेळोवेळी महत्त्वाच्या स्थानिक प्रश्नांच्यामागे आवश्यक पाठिंबा  उभा राहण्याच्या दृष्टीनेही मंच काम करेल.

मंचाचे सभासदत्व
मंच हा लोकाभिमुख पाणी धोरणासाठी संघर्ष उभा करू पाहणार्‍या व्यक्तींचा, मुख्यतः कार्यकर्ते व अभ्यासक यांचा मिळून बनलेला आहे. मंचाचे हे सभासद अर्थातच आपापल्या संघटना-संस्थांचे सभासद आहेत. आपापल्या संघटना-संस्थांचा प्रभाव ते मंचात घेऊन येतील, व मंचाचा प्रभाव आपापल्या संघटना-संस्थांमध्ये घेऊन जातील हे गृहीत आहे, किंबहुना अशी देवाण-घेवाण व्हावी असाच प्रयत्न राहील, परंतु अंतिमतः मंच हा या व्यक्तींचा बनलेला असेल. जात-जमातवादी, धार्मिक कट्टरपंथी प्रवाह मंचाला पूर्णपणे अमान्य आहेत व अशा प्रवाहांना व व्यक्तींना मंचात स्थान असणार नाही.

मंचाच्या बैठकींना जे हजर राहतात, कामकाजात भाग घेतात, पत्रांवर-पत्रकांवर सही करण्यास तयार असतात त्या सर्वाना मंचाने सर्वसाधारणपणे सामावून घेतले आहे. मंचाच्या बैठकांना आतापर्यंत कुणाला मज्जाव केला गेलेला नाही. मंचाच्या आतापर्यंतच्या कामाच्या दिशेशी सर्वसाधारण सहमती असलेल्या व मंचाबद्दल आस्था असलेल्या सर्वाशी मंचाने सातत्याने संपर्क ठेवलेला आहे.

मंचाचे औपचारिक सभासदत्व निश्चित करण्याच्या दृष्टीने दि. ९ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या निर्णयानुसार त्या बैठकीस हजर असणार्‍या सर्वांखेरीज इतर वरील सर्व व्यक्तींशी संपर्क करून त्यांच्यापैकी जे मंचाच्या अत्तापर्यंतच्या वाटचालीमधील दिशेशी सहमती व मंचाच्या कामात क्रियाशील सहभाग देण्यास स्वीकृती दर्शवतील ते मंचाचे सध्याचे सभासद असतील.

नवीन सभासद
नवीन सभासद घेताना मंचातील आधीच्या एका सभासदाने त्याचे नाव मंचाच्या बैठकीत सुचवल्यानंतर ती बैठक त्याबाबत निर्णय घेईल.

पदाधिकारी
भाई एन. डी. पाटील हे मंचाचे निमंत्रक आहेत व भारत पाटणकर सह-निमंत्रक आहेत.  

बैठका 
मंचाचे प्रमुख निर्णय मंचाच्या सर्वसाधारण बैठकांमध्येच होतील.  

बैठकांसाठी विषयपत्रिका सचिव गट तयार करील व बैठकी अगोदर सर्वाना पोचवेल. 

निर्णय बैठकीत हजर असलेल्यांच्या सहमतीने होतील. 

प्रत्येक बैठकीसाठी अध्यक्ष निवडले जातील. कामकाज वेळेवर होईल, सर्व विषयांना न्याय मिळेल, सर्वाना मत मांडण्याचा पुरेसा वाव मिळेल हे पाहणे ही अध्यक्षांची जबाबदारी राहील. त्याबरोबरच होत असलेल्या चर्चेमधून सहमती कशी निर्माण होईल ते पाहणे व त्यासाठी प्रयत्न करणे ही अध्यक्षांची प्रमुख जबाबदारी असेल. बैठकीतील चर्चा व मतांचा कल पाहून शक्यतो सर्वसाधारण सहमतीने किंवा सभेचा सर्वसाधारण कल लक्षात घेऊन अध्यक्ष निर्णय जाहीर करतील व त्या निर्णयाची बूज राखली जाईल. 

बैठकीला हजर राहता येत नसल्यास अजेंड्यावर असलेल्या विषयाबाबत लेखी मत कळवले असल्यास ते चर्चेच्या वेळी व सहमतीच्या निर्णयाच्या वेळी विचारात घेऊन निर्णय घेतले जातील. 

अजेंड्यावर नसलेल्या ऐन वेळेच्या विषयाबाबत निर्णय घेताना हजर नसलेल्या सभासदांच्या  संभाव्य मतांचा विचार करून अध्यक्ष निर्णय घेतील. असा एखादा विषय मतभेदाचा असण्याची शक्यता असेल तर त्यावर शक्यतो निर्णय घेतला जाऊ नये. अजेंड्यावर नसलेल्या अशा विषयावर बैठकीत उपस्थित असलेल्यांच्या सहमतीने निर्णय झाला तरी तो हजर नसलेल्यांना मान्य नसेल तर त्यावर परत चर्चा व्हावी.  

समन्वय समिती
मंचाला एक समन्वय समिती असेल. महाराष्ट्राच्या विविध भागांतील १५ सक्रीय सभासद सध्या समन्वय समितीचे सभासद आहेत. 
समन्वय समितीचे काम हे मंचातील मत-मतांतरांमध्ये व मंचाच्या कामामध्ये समन्वय साधण्याचे असेल. तिला निर्णयाचे अधिकार नसतील. निर्णय मंचाच्या सर्वसाधारण बैठकांमध्येच होतील. 
मंचाच्या सर्वसाधारण बैठकांमध्ये ज्या विषयांमध्ये सहमती होत नसेल असे विषय अध्यक्ष समन्वय समितीकडे सोपवतील व समन्वय समितीवर त्यावर समन्वय साधून सर्वाना घेऊन पुढे जाता येईल असा तोडगा काढण्याचे काम असेल.
मंचाच्या कृती कार्यक्रमाबाबत सर्वसाधारण निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष कृतीची तपशीलातली आखणी समन्वय समिती करेल. त्यासाठी त्या त्या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या कार्यकर्त्याना व संस्था-संघटनाना सोबत घेऊन ती कार्यक्रमाची आखणी करेल.
अशा कृती कार्यक्रमांसाठी कार्यक्रमाच्या अगोदर समन्वय समितीची बैठक होईल व त्यात अ) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी करायचे ब) प्रमुख वक्ते कोण व कोणत्या क्रमाने बोलतील क) ऐनवेळी बदल करायचे झाल्यास ते कोण करेल अशासारख्या गोष्टी अगोदरच ठरवल्या जातील.  

फलक-बॅनर इत्यादी
मंचाचे स्वरूप लक्षात घेता संघटना-संस्थांचे स्वतःचे फलक अशा कार्यक्रमामध्ये असू नयेत. फक्त मंचाचेच फलक व बॅनर इत्यादी असावेत.

No comments:

Post a Comment